निर्भिड पत्रकार – रोहित जाधव
जीवनाच्या कोणत्याही क्षेत्रात यशस्वी व्हायचे असेल तर कठोर परिश्रम आणि मेहनतीला पर्याय नाही असे प्रतिपादन सुप्रसिद्ध व्याख्याते ॲड. प्रा.श्रीकांत माळकर यांनी केले. घालवाड ता.शिरोळ येथील बालशिवाजी तालीम मंडळाने अक्षयतृतीया , पारंपारिक शिवजयंती व महात्मा बसवेश्वर जयंती निमित्त आयोजित केलेल्या व्याख्यानात प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंडितराव खाडे होते तर शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष रावसाहेब देसाई प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक इमाम पटेल यांनी केले .
यावेळी बोलताना ॲड. माळकर पुढे म्हणाले,” आपले व्यक्तिमत्व घडवताना विद्यार्थ्यानी अभ्यासाबरोबर मैदानी खेळ , व्यायाम , संतुलित आहार ,वाचन,मनन चिंतन,लेखन या गोष्टींकडेही लक्ष दिले पाहिजे तरच त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास होईल.”
यावेळी युवावक्ते शिवम माळकर यांनी ‘छत्रपती शिवाजी महाराज ‘ , कु.शांभवी माळकर यांनी ‘ छत्रपती संभाजी महाराज ‘, तर कु.प्रज्ञा माळकर यांनी “सोशल मीडियात हरवलेली तरुणाई ‘ या विषयांवर आपले विचार अत्यंत प्रभावीपणे मांडले.त्यांच्या वक्तृत्वाने श्रोते मंत्रमुग्ध होऊन गेले. शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष रावसाहेब देसाई यांचा अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त बालशिवाजी तालीम मंडळाच्या वतीने हृद्य सत्कार करण्यात आला.
दरम्यान येथील मलिकजान बाबा दर्ग्याच्या पटांगणावर झालेल्या या कार्यक्रमास ॲड.उदय मोरे ,मेजर प्रा. के.एम.भोसले,राजू माळी,महेश कुंभार,कार्यक्रमाचे प्रसिध्दी विभाग प्रमुख अनिल खाडे , शिवाजी थोरवत, राजू थोरवत , भरमु मगदूम,बाळासो खाडे ,मदन गायकवाड , संजय नसलापुरे,सुनील खाडे,आनंदा खाडे , जमील जमादार , वस्ताद मिरासो फकीर , वस्ताद दत्तात्रय जाधव, बजरंगबली करिअर अकॅडमीचे विद्यार्थी व विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. डी.बी.साळुंखे यांनी आभार मानले.
