निर्भीड पत्रकार : रोहित जाधव
हिंदू जनजागृती समितीच्या वतीने राज्य सरकारच्या मदरसा आधुनिकीकरण योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या अनुदानावर तीव्र आक्षेप नोंदवण्यात आला आहे. या संदर्भात संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.समितीने निवेदनात नमूद केले आहे की, डॉ. जाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजनेअंतर्गत राज्यातील २१ जिल्ह्यांतील ३०८ मदरशांना प्रत्येकी ५० लाख रुपयांचे अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे राज्यघटनेतील समानतेच्या तत्त्वांचा भंग होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.निवेदनात पुढे असेही म्हटले आहे की, शासनाचा निधी हा सर्व नागरिकांच्या करातून जमा होतो. त्यामुळे तो निधी केवळ एका विशिष्ट घटकासाठी वापरणे अन्यायकारक असल्याचे समितीचे मत आहे. तसेच, मदरशांमध्ये दिल्या जाणाऱ्या निधीच्या वापराबाबत पारदर्शकता ठेवून सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.

या निवेदनावेळी हिंदू जनजागृती समितीचे श्री. संजय घाटगे, भारतीय जनता पक्ष जिल्हा सरचिटणीस श्री. राजेंद्र दाईंगडे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जिल्हा कार्यकारी सदस्य श्री. महेंद्र रजपूत, महाराष्ट्र नवनिर्माण सेना कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष श्री. भगवंत जांभळे, हिंदुत्ववादी श्री. कृष्णा मसलकर, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे श्री. नितीन जाधव, श्री. प्रसाद कदम, श्री. साईश मठपती आदी उपस्थित होते.समितीने या निर्णयाचे पुनर्विचार करून तो तात्काळ स्थगित करावा, तसेच सर्व धर्मीय शैक्षणिक संस्थांना समान निकषांवर आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी केली आहे. अन्यथा राज्यभर लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.

