
निर्भिड पत्रकार – रोहित जाधव
माझी वसुंधरा योजनेत राज्यात पहिला क्रमांत मिळविलेल्या धरणगुत्तीमध्ये नागरीकांकडून वेगवेगळे उपक्रम राबविले जातात. अशातच एका बाजूला विभक्त कुटुंब पद्धतीची प्रथा प्रचलित होत असताना धरणगुत्ती (ता.शिरोळ) येथील कोळी परीवाने एकत्रित कुटुंबाने स्नेह मेळावा घेवून जनजागृती केली आहे. त्यानिमित्ताने गावातून फेरी काढून एकत्र कुटुंब संस्काराचा शिल्पकार, एकत्र कुटुंब सुखी कुटुंब, पाणी आडवा पाणी जिरवा, ज्ञानाचा दिवा घरोघरी लावा अशा घोषणा देत सामाजिक संदेश देण्यात आला.
धरणगुत्ती येथे कोळी परिवारातील चार पिढ्यानी एकत्र येऊन कोळी मळा येथे स्नेह मेळावा घेतला. यात कुटुंबातील 122 सदस्य उपस्थित होते.आज समाजात एका बाजूला घर मोठी व कुटुंब छोटी होत चालले आहे. छोटे कुटुंब सुखी कुटुंब ही संकल्पना माणसांच्या मनात रुजल्यामुळे एकत्र कुटुंब पद्धती पूर्णतः नेस्तनाबूत होण्याच्या मार्गावर आहे. अशा काळात धरणगुत्तीतील कोळी परिवारांने समाजासाठी एक वेगळा आदर्श घालून दिला आहे. कै.बाबू कोळी व कै.सोनाबाई कोळी यांना एकूण दहा आपत्य. या सर्वांच्या कुटुंबांनी एकत्र येत स्नेह मेळावा साजरा करून आठवणींना उजाळा दिला.
प्रथम आई वडीलांच्या पाद्यपूजनाचा सोहळा पार पडला. दोन दिवस चाललेल्या या मेळाव्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. दुसर्या दिवशी सकाळी मॉर्निंग वॉक करून निरोगी राहण्यासाठी व्यायामाची गरज असते हा संदेश दिला गेला. ग्रामपंचायतच्या परिसरात 122 जण एकत्र येऊन सामूहिक राष्ट्रगीत गायन करण्यात आले. त्याचबरोबर एकत्र कुटुंब पद्धतीसाठी प्रतिज्ञा केली. यावेळी माजी सरपंच शेखर पाटील, भालचंद्र लंगरे, विनोद कोळी, रविद्र कारदगे, रोहन कोळी, शशिकांत कोळी, डॉ.दादा कोळी, प्रदिप कोळी, राहुल कोळी, सुनिल कोळी, स्वप्निल कोळी, विजय सुर्यवंशी यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
