
निर्भीड पत्रकार – रोहित जाधव
केसरी वृत्तसेवा जयसिंगपूर सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासनातर्फे राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जागतिक हिवताप दिन हेरवाड हायस्कूल हेरवाड येथे साजरा करण्यात आला.”मलेरिया विरुद्ध जगाच्या संरक्षणासाठी,गतिमान करूया लढा मलेरिया हरविण्यासाठी.” “आपले आरोग्य आपल्या हाती आपण रोखू रोगांच्या साथी” अशा आशयाची डास निर्मूलनाची प्रतिज्ञा विद्यार्थ्यांच्याकडून म्हणवून घेण्यात आली.
त्याचबरोबर विद्यालयातील सहाय्यक शिक्षिका सौ.सिमा माळी यांनी हिवताप रोगांबद्दल माहिती सांगताना विषाणूजन्य आजारावर निश्चित उपाय आहे पण रुग्णांच्या प्रतिकारशक्तीवर उपचार हाच खरा मार्ग ठरतो पण वेळेवर उपचार न मिळाल्यास मृत्यू होऊ शकतो, उपचार अर्धवट सोडल्यास कालांतराने पुन्हा रोगाची लागण होते.
डेंगी/चिकनगुणीया , मलेरिया/ हिवताप या रोगास मादी डास कारणीभूत ठरते. कारण नर डास चावत नाहीत. महत्त्वाचे म्हणजे,ह्या डासांची पैदास साठवलेल्या उघड्या स्वच्छ पाण्यात होते. त्यामुळे संध्याकाळी दारे- खिडक्या उघड्या न ठेवता बंद ठेवणे,जाळ्या बसवणे, डास प्रतिबंधक मूलम लावणे, मच्छरदाणीचा वापर करणे, फिकट रंगाचे व लांब बाह्यांचे कपडे झोपताना वापरणे, घरात व घराबाहेर पाणी उघडे न ठेवता ते झाकून ठेवावे. मोठ्या पाणीसाठ्यात गप्पी मासे सोडवेत. अशा उपायांमार्फत आपण ह्या रोगापासून संरक्षण करू शकतो असे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र अब्दुललाटच्या डॉ.वंदना गिरमल,श्री.शरद कोळी यांचे सहकार्य मिळाले.सूत्रसंचलन सौ.मनिषा डांगे यांनी तर आभार श्री बीरु देबाजे यांनी मानले.यावेळी मुख्याध्यापिका माणिक नागावे सहाय्यक शिक्षक श्री धनंजय धोत्रे, श्री बाळकृष्ण फल्ले,शिक्षिका सौ.कल्पना माळी व विद्यार्थी उपस्थित होते.
