धरणगुत्ती जिम प्रकरण.बातमी प्रसिद्ध केल्याच्या रागातून ‘निर्भीड महाराष्ट्र’च्या संपादकाला जिम ट्रेनरची फोनवरून धमकी.

निर्भीड पत्रकार : रोहित जाधव

धरणगुत्ती ग्रामपंचायतीच्या सार्वजनिक हॉलमध्ये सुरू असलेल्या जिमच्या दुरावस्थेबाबत काल निर्भीड महाराष्ट्र या माध्यमातून बातमी प्रसिद्ध करण्यात आली होती. या बातमीचा राग मनात धरून संबंधित जिमचा खाजगी ट्रेनर तसेच ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच यांनी निर्भीड महाराष्ट्रचे संपादक रोहित जाधव यांना फोनवरून धमकी दिल्याची गंभीर घटना समोर आली आहे. या प्रकारामुळे तालुक्यातील पत्रकारांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
धरणगुत्ती ग्रामपंचायतीच्या सार्वजनिक हॉलमध्ये सुरू असलेल्या जिममध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता असल्याची तक्रार नागरिकांकडून होत होती. जिममधील साहित्याची होत असलेली नासधूस, देखभालीचा अभाव तसेच बाहेरील लोकांचा वाढलेला वावर यामुळे जिमची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत असल्याची बाब स्थानिक नागरिकांनी निदर्शनास आणून दिली होती. नागरिकांच्या मागणीनुसार या सर्व प्रकाराची वस्तुस्थिती मांडणारी बातमी निर्भीड महाराष्ट्रमध्ये प्रसिद्ध करण्यात आली.
मात्र ही बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर संतप्त झालेल्या जिमच्या खाजगी ट्रेनरने संपादक रोहित जाधव यांना फोन करून दमदाटी केल्याचा आरोप करण्यात आला आहे. पत्रकारांना धमकावून सत्य दडपण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप पत्रकार संघटनांकडून केला जात आहे.
या घटनेची माहिती रोहित जाधव यांनी ग्रामविकास अधिकारी तसेच ग्रामपंचायतीतील इतर जबाबदार पदाधिकाऱ्यांच्या कानावर घातली आहे. मात्र या संदर्भात “विचारून घेतो, चौकशी करतो” एवढेच माफक उत्तर संबंधित अधिकाऱ्यांकडून देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान, या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत तालुक्यातील विविध पत्रकार संघटनांनी एकत्र येत ग्रामपंचायत, गटविकास अधिकारी, जिल्हाधिकारी तसेच पोलीस प्रशासन यांना निवेदन देण्याचा निर्णय घेतला आहे. संबंधित जिम ट्रेनरवर तात्काळ चौकशी करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात येणार आहे.
जर या प्रकरणात प्रशासनाने तातडीने कारवाई केली नाही तर ग्रामपंचायत कार्यालयासमोर उपोषण आंदोलन छेडण्याचा इशाराही पत्रकार संघटनांकडून देण्यात आला आहे.
“पत्रकारांनी गावातील समस्या मांडायच्या नाहीत का? वास्तव परिस्थिती जनतेसमोर आणल्यानंतर सत्ताधाऱ्यांनी नेमलेल्या गावगुंडांकडून पत्रकारांना धमकावले जात असेल, तर सत्ताधाऱ्यांची मनमानी सामान्य नागरिकांनी किती दिवस सहन करायची?” असा सवाल पत्रकार संघटनांकडून उपस्थित केला जात आहे.
या घटनेमुळे धरणगुत्ती गावासह संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली असून पत्रकारांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. प्रशासनाने या प्रकरणात तातडीने हस्तक्षेप करून सत्य परिस्थिती समोर आणावी आणि दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे.#

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!