निर्भीड पत्रकार : रोहित जाधव
सोनी-भोसे (ता. मिरज) रस्त्यावरील शेतात शेतकरी पिता-पुत्राने कीटकनाशक प्राशन करून जीवन संपविल्याची धक्कादायक घटना आज शुक्रवारी सकाळी उघडकीस आली आहे. या घटनेने सोनी गावात हळहळ व्यक्त होत आहे. गणेश हिंदुराव कांबळे (वय 52) इंद्रजीत गणेश कांबळे (वय 23) अशी मृतांची नावे आहेत.
आज पहाटे गणेश कांबळे हे नेहमीप्रमाणे आपल्या शेताकडे गेले होते. शेतात ते बेशुद्ध अवस्थेत पडल्याचे दिसल्याने इतर शेतकऱ्यांनी तातडीने त्यांच्या कुटुंबीयांना माहिती दिली. गावातील रुग्णवाहिका घेऊन मुलगा इंद्रजीत व नातेवाईक घटनास्थळी पोहोचले. गणेश कांबळे यांना रुग्णवाहिकेतून घेऊन जात असताना अचानक इंद्रजीतनेही मागे जाऊन कीटकनाशक प्राशन केले. या धक्कादायक प्रकारामुळे उपस्थित सर्वांची धावपळ उडाली.
पिता-पुत्रांना तातडीने मिरज येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच दोघांचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपविभागीय अधिकारी प्रणील गिलडा व ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अजित सिद यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
इंद्रजीत कांबळे याचा अवघ्या महिन्याभरापूर्वी विवाह झाला होता. तेव्हा वडील व नवविवाहित मुलाने असा टोकाचा निर्णय का घेतला? याचे नेमके कारण अस्पष्ट असून पिता-पुत्रांच्या या आत्महत्या प्रकरणाचा अधिक तपास मिरज ग्रामीण पोलीस करीत आहे.
