निर्भीड पत्रकार : रोहित जाधव
मिरज | मिरज तालुक्यातील बेळंकी गावात महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांवर लाचखोरीचा डाग लागला आहे. नुकतेच येथे रुजू झालेले ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) विद्यासागर चव्हाण आणि कोतवाल राजू वाघमारे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (ACB) पथकाने आज (३ जुलै) दुपारी अडीच हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ अटक केली. ही कारवाई दुपारी सुमारे १.३० वाजता करण्यात आली.

प्राप्त माहितीनुसार, एका नागरिकाने आपल्या नोंदणी प्रक्रियेसाठी तलाठी कार्यालयात अर्ज दाखल केला होता. या नोंदणीस मंजुरी देण्यासाठी तलाठी व कोतवाल यांनी थेट अडीच हजार रुपयांची लाच मागितल्याची तक्रार संबंधित नागरिकाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली होती.
तक्रारीची पडताळणी करून ACB पथकाने सापळा रचला आणि ठरल्याप्रमाणे लाच स्वीकारताना तलाठी चव्हाण व कोतवाल वाघमारे यांना रंगेहाथ पकडले. या प्रकरणी पुढील तपास सुरू असून लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अधिक माहिती घेत आहे.
