पूरस्थितीत आधार ठरणाऱ्या शेडशाळ–कागवाड रस्त्याच्या कामाचा शुभारंभ.
निर्भीड पत्रकार : रोहित जाधव
जयसिंगपूर :
पूरस्थितीमुळे संपर्क तुटणाऱ्या सात गावांसाठी शेडशाळ ते कागवाड (कातरकट्टी) हा रस्ता म्हणजे जीवनरेषाच आहे. त्यामुळे या रस्त्याचा दर्जा सुधारण्यासाठी ३५ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. लवकरच या रस्त्याचे काम पूर्ण होणार आहे. भविष्यात शिरोळ तालुक्यातील रस्त्यांच्या विकासासाठी देखील निधी कमी पडू दिला जाणार नाही. असे प्रतिपादन आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी केले.
शिरोळ तालुक्यातील पूरग्रस्त गावांच्या दळणवळणासाठी अत्यंत महत्त्वाचा असलेल्या शेडशाळ ते कागवाड (कातरकट्टी) रस्त्याच्या कामाचा शुभारंभ आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या हस्ते नुकताच करण्यात आला, यावेळी आमदार यड्रावकर बोलत होते.
यावेळी आमदार म्हणाले, शिरोळ तालुक्यात दरवर्षी पुराची स्थिती उद्भवते. यामध्ये शेडशाळ, गणेशवाडी, आलास, बुबनाळ, औरवाड, गौरवाड आणि कवठेगुलंद या सात गावांचा मुख्य तालुक्याशी संपर्क तुटतो.

अशावेळी शेडशाळ–कागवाड मार्ग हाच एकमेव पर्यायी मार्ग राहतो. मात्र गेल्या अनेक वर्षांपासून या मार्गाची अवस्था अत्यंत खराब झाली होती. नागरिकांची अडचण लक्षात घेऊन या रस्त्याच्या खडीकरण आणि डांबरीकरणासाठी ३५ लाखांचा निधी मंजूर आहे. लवकरच रस्त्याचे काम पूर्ण होऊन हा रस्ता मजबूत होणार असल्याचे सांगितले.
शिरोळ तालुक्यातील दळणवळण सुलभ आणि मजबूत करण्याच्या दृष्टीने राज्य शासनाच्या विविध योजनांतून मोठ्या प्रमाणात निधी प्राप्त करून घेतला जात आहे. तालुक्यातील प्रत्येक गावात चांगले रस्ते तयार करून नागरिकांना सुविधा मिळवून देणे हे माझे प्राथमिक उद्दिष्ट आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी सरपंच प्रशांत अपिने, उपसरपंच जयपाल खोत, गटविकास अधिकारी नारायण घोलप, पंचायत समितीचे उपअभियंता बदडे, ग्रामविकास अधिकारी विनायक शिवरे, तसेच सुभाष शिरगावे, परशुराम गौराजे, बाळासो अपिने, धनपाल खोत, ग्रा.पं. सदस्य गजानन गताडे, पोलीस पाटील संदीप अपिने, बाळासो बनकर, सलीम कोरबू, नावाडी सदाशिव आंबी, धुळाप्पा आंबी यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
