मुंबई येथे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते डॉ दगडू माने यांचा सन्मान ; मान्यवरांची उपस्थिती
निर्भीड पत्रकार : रोहित जाधव
मुंबई : शिरोळ तालुका पुरोगामी चळवळीचे कार्यकर्ते, पत्रकार व सिनेअभिनेते डॉ. दगडू श्रीपती माने ( शिरोळ ) यांना राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
मुंबई येथे यशवंतराव चव्हाण सभागृहात आयोजित शानदार समारंभात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सन्मानचिन्ह , सन्मानपत्र व रोख रक्कम देऊन डॉ दगडू माने व त्यांच्या पत्नी संगीता माने यांचा गौरव करण्यात आला.

या समारंभास सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट, सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे, समाजकल्याण पुणे विभागाचे आयुक्त ओमप्रकाश बकोरिया, राज्यमंत्री भारत गोगावले, राज्यमंत्री संजय राठोड यांच्यासह समाज कल्याणचे सचिन परब , विशाल पोवार , राजेंद्र प्रधान, वैभव माने, श्रेयश माने, विलास कांबळे, शंकर बिराजदार, विश्वास कांबळे, राहुल पोवारआदी मान्यवर उपस्थित होते.

डॉ. दगडू माने यांनी तीन दशकाहून अधिक काळ समाजसेवा, पत्रकारिता व चित्रपट सृष्टीच्या माध्यमातून आदर्शवत कार्य केले आहे. सामान्य जनतेच्या प्रश्नावर आंदोलने करून जनतेला न्याय मिळवून देणारा तसेच फुले – शाहू – डॉ आंबेडकर चळवळीचा कार्यकर्ता म्हणून त्यांची ख्याती आहे. लोकसेवेच्या कार्याची दखल घेऊन राज्य शासनाने डॉ माने यांना डॉ बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्काराने गौरविले आहे. त्यांच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
